परिचय
ऊर्जा विभागाविषयी
महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग राज्यातील सर्व ग्राहकांना विश्वासार्ह, सुरक्षित आणि शाश्वत ऊर्जेचा पुरवठा करण्यास वचनबद्ध आहे. राज्याच्या विकासाला बळ देण्यात ऊर्जा विभाग आघाडीवर आहे. ऊर्जा विभाग हा राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खाण विभागातील महत्त्वाचा विभाग आहे. राज्याच्या ऊर्जा क्षेत्राचे चित्र निश्चित करण्यात, आर्थिक विकासाला गती देण्यात आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात ऊर्जा विभाग मोलाची भूमिका बजावतो.
प्रमुख जबाबदाऱ्या
- विविध साधनांद्वारे वीजनिर्मिती करण्यास अनुकूलता निर्माण करणे – यामध्ये पारंपरिक आणि नवीकरणीय तंत्रज्ञानाचा समावेश होतो आणि राज्यात नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर आहे.
- राज्यात अखंड आणि परवडणाऱ्या दरात वीज पुरवठा होण्याची हमी देणे – राज्यभर विजेचे वहन आणि वितरण यावर देखरेख करणे.
- वीज ग्राहक आणि उद्योग यांना विश्वासार्ह आणि सुरक्षित वीज पुरवठा देणे – उच्च दर्जा टिकविणे.
- ऊर्जेची कार्यक्षमता, ऊर्जा संवर्धन आणि शाश्वत उपायांचा स्वीकार प्रोत्साहित करणे – राज्याची वाढती विजेची गरज पूर्ण करताना.
महत्त्वाचे टप्पे – महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची पुनर्रचना
विद्युत कायदा २००३ च्या अंतर्गत २००५ साली महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची (एमएसईबी) सर्वंकष फेररचना करण्यात आली. हे खात्याच्या इतिहासातील महत्त्वाचे यश होते. या सुधारणेमुळे राज्याच्या ऊर्जा क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्याचा आणि कार्यक्षमता वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला.
- एमएसईबी सूत्रधारी कंपनी मर्यादित: ही कंपनी ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या सरकारी कंपन्यांची सूत्रधारी कंपनी म्हणून काम करते आणि या कंपन्यांच्या योग्य धोरणात्मक दिशेबाबत आणि गुंतवणुकीबाबत खबरदारी घेते.
- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण): राज्यात दूरदूरपर्यंत कानाकोपऱ्यात विद्युत पुरवठा उपलब्ध करून कोट्यवधी ग्राहकांना सेवा उपलब्ध करण्याची जबाबदारी महावितरणवर आहे.
- महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती): राज्य सरकारच्या मालकीची ही देशातील सर्वात मोठी वीजनिर्मिती कंपनी असून ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी समजली जाते.
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण): ही कंपनी राज्यातील विस्तृत वीजवहन जाळ्याचे व्यवस्थापन करते आणि ऊर्जानिर्मिती केंद्रांपासून वितरणच्या केंद्रांपर्यंत कार्यक्षम रितीने वीजवहन होण्याची खबरदारी घेते.
पूरक संस्था आणि नियामक चौकट
- मुख्य विद्युत निरीक्षक: सार्वजनिक हिताचे रक्षण करत विविध आस्थापनांमध्ये विद्युत सुरक्षा व नियामक बाबींचे अनुपालन तसेच तांत्रिक देखरेखीचे काम करतात.
- महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा): महाऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धनाच्या बाबतीत राज्याची नोडल एजन्सी असून ही संस्था पर्यावरणपूरक ऊर्जा तंत्रज्ञानांचा विकास, प्रोत्साहन आणि अंमलबजावणीसाठी तसेच ऊर्जा संवर्धनाच्या उपायांसाठी काम करते.
- महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग: ऊर्जा क्षेत्रात उचित कार्यपद्धती राबविणे, वीजदराचे नियमन आणि ग्राहकांचे हितरक्षण असे नियामक म्हणून स्वतंत्रपणे काम करते.
विकास आणि शाश्वततेची बांधिलकी
- झपाट्याने विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि विस्तार
- नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत नवोन्मेषाला प्रोत्साहन
- पारदर्शकता, स्पर्धा आणि ग्राहकांचे संरक्षण याला बळ देण्यासाठी नियामक चौकट सुदृढ करणे.
- परवडणाऱ्या दरात विश्वासार्ह आणि शाश्वत ऊर्जा पुरवठा करून सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावणे.
ऊर्जा विभाग आपल्या प्रयत्नातून सातत्याने राज्याच्या विकासासाठी ऊर्जा देत आहे आणि राज्याचे भवितव्य अधिक उजळ, समृद्ध आणि पर्यावरणपूरक असावे यासाठी काम करत आहे.